मृत्युंजय – शिवाजी सावंत

मृत्युंजय – शिवाजी सावंत

सत्य हे पाहणाऱ्यांच्या वा ऐकणाऱ्यांच्या इच्छेचा विचार कधीच करीत नसतं! ते नेहमीच जसं असतं तसंच पुढे येत असतं. उगवत्या सूर्यदेवासारखं!


आठवणी या नेहमी हत्तीच्या पायांसारख्या असतात. त्या आपला खोलवर ठसा मनाच्या ओलसर भूमीवर मागे ठेवूनच जातात.

अश्रू दे दुबळ्या मनाच प्रतीक आहे. जगातील कोणत्याही दुःखाची आग अश्रूंच्या पाण्याने कधीच विझत नसते.

स्वप्न म्हणजे काय आहे? अतृप्त मनाच्या इच्छा पुरवणारा कल्पवृक्ष.

पण ज्याला जग दुर्गुण म्हणतं तो दुर्गुण म्हणजे तरी काय? कुणालातरी ते निश्चितपणानं सांगता येईल काय? कारण मला माहीत आहे, दुबळ्या मनाच्या कर्तृत्वशून्य माणसांनी निर्माण केलेल्या ह्या सर्व खोट्या आणि खुळ्या कल्पना आहेत. कारण ज्या कृतीला जग एकदा सद्‌गुण म्हणतं, त्याच कृतीला दुसऱ्या वेळी ते दुर्गुण म्हणतं आणि ते बरोबरही असतं. उदाहरण द्यायचं झालं, तर मानवाच्या हत्येचं देता येईल. एखादा ज्वलंत देशप्रेमी माणूस आपल्या राज्यातील एखाद्या घरभेद्याला ठार मारतो. जग अशा मारणाऱ्याला राष्ट्रभक्त म्हणून ओळखतं. त्याच्या नावाचा गगनभेदी जयजयकार करतं, पण एखादा लुटारू धनाच्या लोभानं एखाद्या वाटसरूच्या डोक्यात परशू घालतो. जग त्याला हत्यारा म्हणतं. कृती एकाच प्रकारची असते. एका माणसाकडून दुसऱ्या माणसाच्या हत्येची, पण जग एका मारेकऱ्याला राष्ट्रभक्त म्हणतं, तर दुसऱ्याला वधिक म्हणतं.

निद्रा ही सर्वांत अधिक उदारहृदयी माता आहे! व्यक्तिव्यक्तींची विभिन्न दु:खं ती एकाच ममतेनं काही काल का होईना; पण निश्चितच आपल्या विशाल उदरात घेते!

श्रद्धा म्हणजे काटेरी जीवनावरची हिरवळ! स्वत:वरच श्रद्धा हवी. ज्याची स्वत:वर स्वत:च्या दिव्य स्वरूपावर श्रद्धा नाही तो जगासाठी, इतरांसाठी काहीच करू शकत नाही.

 तीन पिढ्यांचा तो अतिशय बोलका मूक संवाद फक्त शांतपणे जळण्याची ताकद असलेल्या भोवतीच्या समयांनाच कळत होता!

राजकारण केवळ दंडाच्या बलावर वा मनाच्या चांगुलपणावर कधीच चालत नसतं. ते बुद्धीच्या कसरतीवर चालत असतं! माजलेलं अरण्य नष्ट करायचं झालं, तर तुझ्यासारखा साधाभोळा वीर हातात परशू घेऊन जीवनभर ते एकटाच वेड्यासारखं तोडीत बसेल! पण... पण माझ्यासारखा एका ठिणगीतच त्याची वासलात लावील!

 आपल्याच विनाशाचे खड्डे खणणारा मानव हा या जगातला एकमेव प्राणी असावा!

शंका ही घायपातासारखी असते! एकदा का तिनं मूळ धरलं की, ती वाढतच जाते आणि शेवटी तिचं दाट गचपणात रूपांतर होतं.

माणूस बुद्धीच्या आणि संपत्तीच्या जोरावर जगाला सहज फसवू शकतो, पण आपल्या मनाला फसविता येणं कुणालाच शक्य नसतं.

संपत्ती हे जीवनचक्र चालविण्याचं एक साधन आहे. केवळ तेच साध्य कधीच होऊ शकत नाही. तसं झालं की, भल्याभल्यांना कल्पनाही करता येणार नाही अशा आपत्ती कोसळतात. समाजात अकल्पित अपराध वाढतात.

मानवाची खरी संपत्ती आहे बुद्धिमत्ता! सुसंस्कारांनी पैलू पाडलेली निकोप बुद्धिमत्ता हेच खरं रत्न, तीच कणभर का होईना जीवन पुढे नेते. त्याचा विकास करते.

जीवन ही भीक मागून मिळणारी वस्तू नव्हे. जीवन म्हणजे पूर्णत्वासाठी अनंताकडून अनंताकडे चालू असणारा अखंड प्रवास आहे!

द्वेषा‍तून कपट, कपटातून क्रोध आणि क्रोधातून युद्ध जन्म घेत असतं! युद्धांनी प्रश्न कधीच मिटत नसतात - उलट त्यांतून नवे जटिल प्रश्न निर्माण होतात.

माणसाला सर्वांत क्रूर करतो तो त्याचा स्वार्थ! भुकेनं व्याकूळ झालेला सिंह आपली भूक शमविण्यासाठी एखादा प्राणी मारून खातो, पण तो कधीच दुसरा सिंह नाही मारून खात! स्वार्थानं व्याकूळ झालेला माणूस मात्र एक नाही, दोन नाही, लक्षावधी माणसं मारण्यासही मागंपुढं पाहत नाही! सिंहाला क्रूर म्हणण्याचा कोणताच नैतिक आधिकार माणसाला नाही! विधात्यानं निर्माण केलेल्या जीवसृष्टीतील माणूस हाच सर्वांत क्रूर प्राणी आहे! तरीही विद्वान लोक मानवाला सुसंस्कृत मानतात. मानव श्रेष्ठ प्राणी आहे, पण केव्हा, जर तो स्वार्थ टाकून इतरांसाठी रक्ताचा कणन्कण झिजवीत असेल तर! नाहीपेक्षा मानव धर्म, भवितव्य, राज्यकारभार यांच्या कितीही वल्गना करीत असो त्या कवडीमोलाच्याच आहेत! माणसाला सगळ्यात मोठा शाप कोणता असेल तर तो स्वार्थाचा!

मनाचं पटांगण! या पटांगणावर आकांक्षांचे सजविलेले रथ घेऊन सहस्र वर्षं‍ मानव या स्पर्धेत भाग घेत आला आहे. पण काळाच्या नि:पक्ष पंचानं त्याला या स्पर्धेत कधीही विजयी म्हणून घोषि‍त केलेलं नाही.

जीवन ही सूर्यापासून स्फुरलेली एक दिव्य प्रकाशलाट आहे! आणि हे ज्याला नि:संदेह पटलं आहे, त्याचं जीवन प्रकाशाशिवाय अन्य काय असणार?”

 तिरस्काराचे शब्द म्हणजे कानांच्या वारुळात घुसणारे विषा‍री भुजंग!!

मला वाटतं भवितव्य ही मानवानं निर्माण केलेली भयानक भूल आहे! जरा सखोलपणानं विचार करून पाहा! काळाला कधीतरी भूत आणि भविष्‍य आहे काय? काळ हा अखंड आहे आणि अखंडत्वाची जाणीवच मानवाला खऱ्या अर्थानं निर्भय करू शकेल!

माणूस बुद्धीच्या आणि संपत्तीच्या जोरावर जगाला सहज फसवू शकतो, पण आपल्या मनाला फसविता येणं कुणालाच शक्य नसतं. ज्याच्या-त्याच्या खऱ्या व्यक्तिमत्त्वाचं प्रतिबिंब ज्याच्या-त्याच्या मनाच्या दर्पणात स्पष्ट पडलेलं असतं. प्रत्येक माणूस आपल्या एकांतवेळी या दर्पणात स्वत:चीच विविध रूपं पाहत असतो. काही-काही वेळा ही रूपं आकर्ष‍क व आभिमान वाटण्यासारखी असतात, पण बऱ्याच वेळा ही रूपं डोळ्यांपुढं येऊसुद्धा नयेत असं वाटतं.

सत्य हे राजाचा मार्ग ठरवीत नसतं. राजा ठरवील तोच मार्ग सत्य म्हणून समाज स्वीकारीत असतो!

वीरांनो, मी ही बोलावलेली माझ्या आयुष्‍यातील पहिलीच सभा आहे - कदाचित शेवटीचीही असेल! मी तुमच्यासमोर उभा आहे; तो कुरूंचा योद्धा म्हणून नव्हे, पितामह म्हणून नव्हे, परशुरामशिष्‍य भीष्‍म म्हणून नव्हे, जे राज्य मी कधीच उपभोगलं नाही त्या राज्याचा सेवक म्हणूनही नव्हे; तर तुमच्यासारखाच, जीवनाचा संघर्ष‍ - एका डोळ्यात विजयाचे आनंदाश्रू आणि दुसऱ्या डोळ्यात पराभवाचे दु:खाश्रू घेऊन पाहिलेला एक सामान्य कुरू म्हणून उभा आहे!

मी म्हणजे रसरसलेल्या लोखंडाचा तप्त रस होतो! मी म्हणजे कडाडणाऱ्या विजेचा लोळ होतो! मी म्हणजे सहस्र अश्वांचं बल असलेला प्रतिसूर्य होतो!

निखळ विजय किंवा मरण! माझ्या गुरूनं अर्ध्या तपाच्या ज्ञानसाधनेत मला एकच शिकवलं होतं, ‘‘विजय किंवा मरण!

सत्य ते की, जे शाश्वत आणि नित्य असतं! त्या दृष्टीनं विचार केला तर मला सत्य केवळ एकच वाटतं. सूर्याची ही असंख्य किरणं! किती अनादी कालापासून ती पृथ्वीला जीवनदान देत आली आहेत! त्यांच्या दिव्य स्वरूपात कधी बदल झाला आहे काय? त्यांनी कधी आपला सर्वांना स्पर्श करायचा दिव्य गुणधर्म सोडला आहे काय?”

 नीतीचे नियम आदर्श वचनांवरून केवळ ठरत नसतात. ते जीवनातल्या जागत्या अनुभवावरूनही ठरत असतात!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या