सुखाचा शोध – वि.स.खांडेकर.
जगाला प्रवाहाबरोबर वाहत जायला हवे ! मग तो प्रवाह माणसाला कुठेही नेऊन सोडो. पोषाख, शिक्षण, खाणेपिणे, लग्न, कुठलीही गोष्ट घेतली तर बहुतेक माणसे प्रवाह पतितासारखी वागतात. प्रवाहाविरुद्ध पोहणे म्हणजे जगणे ही कल्पना त्यांना पटत सुद्धा नाही.
आपल्यावर कुणी तरी उत्कट प्रेम करीत आहे, आपल्याला एवढेसुद्धा दुःख होऊ नये म्हणून कुणीतरी जीवापाड काळजी घेत आहे, ही जाणीव किती सुखदायक असते!
देवापाशी दया नाही, माणसाजवळ न्याय नाही,मग जगात जगायचे तरी कशाकरिता ?
स्त्री उत्कट प्रेमावर जगते. पण तसले प्रेम जगात आहे कुठे ? आणि ज्या दुर्दैवी स्त्रीला स्वतःच्या घरात प्रेम मिळत नाही, तिला ते घराबाहेर कुठून मिळणार ? बिळांत असेपर्यंत ससा सुरक्षित असतो एकदा तो बिळाबाहेर पडला की त्याला कुत्र्याने फाडावा नाहीतर माणसाने तोडावा! स्त्रीचे आयुष्य ही अशा सशा सारखे आहे!
जग म्हणजे जीव घेण्याचा एक मोठा कारखाना झाले आहे उंदराला मांजर मारते नि माणसाला माणूस जगू देत नाही.....
मरायला तयार झालेले माणूस निर्दय होते हेच खरे !
मनुष्याच्या मनाला प्रेमाची, स्नेहाची, सोबतीची किती विलक्षण भूक असते! मेल्यावर सुद्धा कुणी तरी आपल्याबरोबर असावी असे त्याला वाटते.
खरे प्रेम हे अग्निदिव्य आहे. त्यागावाचून, अहंकार विसरता आल्यावाचून, हृदयाने हृदय जाणण्यावाचून खरे प्रेम करता येत नाही.
माणसाच्या पोटात जशी आग उठते तशी ती हृदयातही उत्पन्न होते. प्रितीची भूक सुद्धा पोटाच्या भूकेइतकीच महत्वाची आहे.
मनातल्या मनात प्रत्येक जण कवी असतो कुणी कविता करतो, कुणी करीत नाही, एवढाच काय तो फरक.
प्रेम हा एक रबरी फुगा आहे. फुंकता फुंकता तो सुंदर दिसू लागतो. चांगला फुगतो........पण तो केव्हा फुटेल याचा मात्र नेम नसतो!
जग हा बाजार आहे एक. या बाजारात लबाड माणसाची बोरे द्राक्षांच्या भावाने जातात. पण प्रामाणिक माणसाची द्राक्षे करवंदाच्या दरानेसुद्धा खपत नाहीत !
सुख दोन माणसांच्या जगात असते. पण त्या दोन माणसाची होते ज्या वेळी एकरूप होतात, त्याच वेळी ते प्रगट होते.
त्याग हा प्रीती मंदिराचा पाया आहे. भोग हा त्या मंदिराचा कळस आहे. पाया वाचून कुठलेही मंदिर उभे राहू शकत नाही.
समाजसेवा हे प्रीतीचेच विशाल रूप आहे. ज्याला आपल्या घरावर प्रेम करता येत नाही, आपल्या माणसावर प्रेम करता येत नाही, त्याला समाजावरही प्रेम करता येणार नाही !
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या