October 8, 2014 4:02 AM

गाणाऱ्या पक्ष्यास......

Ganarya pakshyas marathi poem by balkavi
समय रात्रीचा कोण हा भयाण
बळे गर्जे हे त्यांत घोर रान
अशा समयी छबुकड्या पाखरा तू
गात असशी; बा काय तुझा हेतू?

गिरी वरती उंच उंच हा गेला
तमे केले विक्राळ किती याला
दरी गर्जे, फूत्कार पहा येती,
किती झंझानिल घोर वाहताती

दीर्घ करिती हे घूक शब्द काही
क्रूर नादे त्या रान भरुनी जाई
अशा समयी हे तुझे गोड गाणे
रम्य पक्ष्या, होईल दीनवाणे

तुझ्या गानाचे मोल नसे येथे
कुणी नाही संतुष्ट ऐकण्याते
जगे अपुल्या कानास दिली टाळी
वृथा मानवी हाव अशा वेळी

तुझे गाणे हे शांत करी आता
पहा, गर्जे वन घोर हे सभोंता
किर्र करिती हे तीक्ष्ण शब्द कीट
असे त्यांचा या समयी थाटमाट

पुढे येईल उदयास अंशुमाली
दिशा हसतील वन धरिल रम्य लाली
हरिणबाळे फिरतील सभोवार
तदा येवो गाण्यास तुझ्या पूर

तुझे भ्राते दिसतील एक ठायी
हरित कुंजी ज्या हास्य पूर्ण काही
वदुनि त्यांच्या सह रम्य गीत बा रे
मधुर नादे वन भरुनि टाक सारे


कवी - बालकवी

ती फुलराणी

ती फुलराणी
हिरवे हिरवेगार गालिचे - हरित तृणाच्या मखमालीचे;
त्या सुंदर मखमालीवरती - फुलराणी ही खेळत होती.
गोड निळ्या वातावरणात - अव्याज-मने होती डोलत;
प्रणयचंचला त्या भ्रूलीला - अवगत नव्हत्या कुमारिकेला,
आईच्या मांडीवर बसुनी - झोके घ्यावे, गावी गाणी;
याहुनि ठावे काय तियेला - साध्या भोळ्या फुलराणीला ?

पुरा विनोदी संध्यावात - डोलडोलवी हिरवे शेत;
तोच एकदा हासत आला - चुंबून म्हणे फुलराणीला-
"छानी माझी सोनुकली ती - कुणाकडे ग पाहत होती ?
कोण बरे त्या संध्येतून - हळुच पाहते डोकावून ?
तो रविकर का गोजिरवाणा - आवडला अमुच्या राणींना ?"
लाजलाजली या वचनांनी - साधी भोळी ती फुलराणी !

आन्दोली संध्येच्या बसुनी - झोके झोके घेते रजनी;
त्या रजनीचे नेत्र विलोल - नभी चमकती ते ग्रहगोल !
जादूटोणा त्यांनी केला - चैन पडेना फुलराणीला;
निजली शेते, निजले रान, - निजले प्राणी थोर लहान.
अजून जागी फुलराणि ही - आज कशी ताळ्यावर नाही ?
लागेना डोळ्याशी डोळा - काय जाहले फुलराणीला ?

या कुंजातुन त्या कुंजातुन - इवल्याश्या या दिवट्या लावुन,
मध्यरात्रिच्या निवान्त समयी - खेळ खेळते वनदेवी ही.
त्या देवीला ओव्या सुंदर - निर्झर गातो; त्या तालावर -
झुलुनि राहिले सगळे रान - स्वप्नसंगमी दंग होउन!
प्रणयचिंतनी विलीनवृत्ति - कुमारिका ही डोलत होती;
डुलता डुलता गुंग होउनी - स्वप्ने पाही मग फुलराणी -

"कुणी कुणाला आकाशात - प्रणयगायने होते गात;
हळुच मागुनी आले कोण - कुणी कुणा दे चुंबनदान !"
प्रणयखेळ हे पाहुनि चित्ति - विरहार्ता फुलराणी होती;
तो व्योमीच्या प्रेमदेवता - वाऱ्यावरती फिरता फिरता -
हळूच आल्या उतरुन खाली - फुलराणीसह करण्या केली.
परस्परांना खुणवुनि नयनी - त्या वदल्या ही अमुची राणी !

स्वर्गभूमीचा जुळ्वित हात - नाचनाचतो प्रभातवात;
खेळुनि दमल्या त्या ग्रहमाला - हळुहळु लागति लपावयाला
आकाशीची गंभीर शान्ती - मंदमंद ये अवनीवरती;
विरू लागले संशयजाल, - संपत ये विरहाचा काल.
शुभ्र धुक्याचे वस्त्र लेवुनि - हर्षनिर्भरा नटली अवनी;
स्वप्नसंगमी रंगत होती - तरीहि अजुनी फुलराणी ती!

तेजोमय नव मंडप केला, - लख्ख पांढरा दहा दिशाला,
जिकडे तिकडे उधळित मोती - दिव्य वर्हाडी गगनी येती;
लाल सुवर्णी झगे घालुनी - हासत हासत आले कोणी;
कुणी बांधिला गुलाबि फेटा - झकमणारा सुंदर मोठा!
आकाशी चंडोल चालला - हा वाङनिश्चय करावयाला;
हे थाटाचे लग्न कुणाचे - साध्या भोळ्या फुलराणीचे !

गाउ लागले मंगलपाठ - सृष्टीचे गाणारे भाट,
वाजवि सनई मारुतराणा - कोकिळ घे तानावर ताना!
नाचु लागले भारद्वाज, - वाजविती निर्झर पखवाज,
नवरदेव सोनेरी रविकर - नवरी ही फुलराणी सुंदर !
लग्न लागते! सावध सारे! सावध पक्षी ! सावध वारे !
दवमय हा अंतपट फिटला - भेटे रविकर फुलराणीला !

वधूवरांना दिव्य रवांनी, - कुणी गाइली मंगल गाणी;
त्यात कुणीसे गुंफित होते - परस्परांचे प्रेम ! अहा ते !
आणिक तेथिल वनदेवीही - दिव्य आपुल्या उच्छवासाही
लिहीत होत्या वातावरणी - फुलराणीची गोड कहाणी !
गुंतत गुंतत कवि त्या ठायी - स्फुर्तीसह विहराया जाई;
त्याने तर अभिषेकच केला - नवगीतांनी फुलराणीला !


कवी - बालकवी

दोष व प्रीती

दोष व प्रीती
दोष असती जगतात किती याचे
नसे मजला सामर्थ्य गणायाचे,
दोष माझा परि हाच मला वाटे
दोष बघता सत्प्रेम कसे आटे?

दोष असती जगतात, असायचे
मला त्यांशी तरि काय करायाचे?
प्रेमगंगेच्या शुद्ध सिंचनेही
शुद्ध होई न जो -दोष असा नाही.

गड्या पुर्णा! मज आस तुझी नाही
सख्या न्युना, ये मार मिठी देही
प्रीति माझ्या ह्रदयात करी वास
न्युनतेला पुर्णत्व द्यावयास !


कवी - बालकवी

नाविन्य

नभा नभात सूर नवे प्रत्येक चांद्णीत तेज नवे आयुष्यात हे पर्व नवे प्रत्येक दिवसात चैतन्य नवे तुझ्या चेहऱ्यावर रंग नवे कवितेत ह्या शब्द नवे           अनामिक
नभा नभात सूर नवे
प्रत्येक चांद्णीत तेज नवे
आयुष्यात हे पर्व नवे
प्रत्येक दिवसात चैतन्य नवे
तुझ्या चेहऱ्यावर रंग नवे
कवितेत ह्या शब्द नवे
                   अनामिक

September 19, 2014 3:12 AM

युगांत -- इरावती कर्वे

मानवी प्रयत्न निष्फळ असतात, मानवी जीवन हे विफलच असायचे, हा धडा मनावर बिंबवण्यासाठी तर महाभारत रचलेले नाही ना, असे सारा वेळ वाटते.मानवांचे प्रयत्न,आकांक्षा,वैर,मैत्री-सगळीच कशी उन्हाळ्याच्या वावटळीने उडविलेल्या पाचोळ्यासारखी क्षुद्र, पोरकट भासतात; पण त्याचबरोबर ज्या व्यक्तींनी ते प्रयत्न केले,आकांक्षा बाळगल्या,त्या व्यक्ती अविस्मरणीय ठरतात, हृदयाला कायमचा चटका लावतात, प्रत्येक व्यक्ती एका विशिष्ट परीपाकाकडे अटळपणे जात असते. आपल्याला त्रयस्थ वाचक म्हणून तो परिपाक दिसत असतो. त्या व्यक्तीलाही तो जाणवला असला पाहिजे, हे महाभारत वाचताना इतक्या तीव्रतेने जाणवते कि, त्या व्यक्तीची व्यथा आपली स्वतःची व्यथा होते.त्या व्यक्तीच्या द्वारे  सबंध मानवतेचे दु:ख आपल्याला खुपत राहते.
                                              युगांत -- इरावती कर्वे

August 16, 2013 4:59 AM

वार्‍याने हलते रान

वार्‍याने हलते रान, तुझे सुनसान हृदय गहिवरले
वार्‍याने हलते रान
गाईचे डोळे करुण उभे की, सांज निळाईतले

डोळयात शीण, हातात वीण, देहात फुलांच्या वेगी
अंधार चुकावा म्हणून, निघे बैरागी
वाळूत पाय, सजतेस काय, लाटांध समुद्रकाठी
चरणात हरवला गंध, तुझ्या की ओठी

शून्यात गरगरे झाड, तशी ओढाळ, दिव्यांची नगरी
वक्षात तिथीचा चांद, तुझा की वैरी

कवी : ग्रेस

तुला पाहिले मी - ग्रेस

तुला पाहिले मी - ग्रेस
तुला पाहिले मी नदीच्या किनारी
तुझे केस पाठिवरी मोकळे
इथे दाट छायातुनी रंग गळतात
या वृक्ष-माळेतले सावळे

तुझी पावले गे धुक्याच्या महालातना वाजली ना कधी नादली
निळा गर्द भासे नभाचा किनारा
न माझी मला अन्‌ तुला सावली

मना वेगळी लाट व्यापे मनाला
जसा डोंगरी चंद्र हा मावळे
पुढे का उभी तू तुझे दुःख झरते
जसे संचिताचे ऋतु कोवळे

अशी ओल जाता तुझ्या स्पंदनातून
आकांत माझ्या उरी केवढा
तमातूनही मंद ताऱ्याप्रमाणे
दिसे की तुझ्या बिलवरांचा चुडा

कवी : ग्रेस

ती येते आणिक जाते - आरती प्रभू

ती येते आणिक जाते
येताना कधि कळ्या आणिते
अन्‌ जाताना फुले मागते
येणे-जाणे, देणे-घेणे
असते गाणे जे न कधी ती म्हणते
येताना कधि अशी लाजते तर जाताना ती लाजविते:
कळते काही उगीच तेही
नकळत पाही काहीबाही,
अर्थावाचुन असते ’नाही’, ’हो’, ही म्हणते

येतानाची कसली रीत:
गुणगुणते ती संध्यागीत,
जाताना कधि फिरून येत,
जाण्यासाठिच दुरुन येत,
विचित्र येते, विरून जाते जी सलते

कळ्याफुलांच्या मागे येते
कोमट सायंचेहरा घेते
उदी उदासी पानी भरते
"मी येऊ रे ?" ऐकू येते
मध्यरात्रभर तेच तेच प्रतिध्वनि ते

कवी : आरती प्रभू

कुणाच्या खांद्यावर - आरती प्रभू

 kailash Khedekarकुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे
कशासाठी उतरावे तंबू ठोकून
कोण मेले कोणासाठी रक्त ओकून
जगतात येथे कुणी मनात कुजून

तरी कसे फुलतात गुलाब हे ताजे
दीप सारे जाती येथे विरुन विझून
वृक्ष जाती अंधारात गोठून जळून
जीवनाशी घेती पैजा घोकून घोकून
म्हणती हे वेडे पीर तरी आम्ही राजे


अंत झाला अस्ताआधी, जन्म एक व्याधी
वेदनांची गाणी म्हणजे, पोकळ समाधी
देई कोण हाळी त्याचा, पडे बळी आधी
हारापरी हौतात्म्य हे, ज्याच्या गळी साजे


कवी : आरती प्रभू